Thursday, 22 January 2015

हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !!



हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी १९२७ : शिवसेनाप्रमुखांचा पुणे येथे जन्म. शालेय जीवनातच चित्रकलेची प्रचंड आवड, खासकरून व्यंगचित्राची. १९४५ : ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ‘कार्टुनिस्ट’ म्हणून काम सुरू केले. १४ जून १९४८ : शिवसेनाप्रमुखांचा विवाह कु. सरला वैद्य यांच्यासोबत झाला. १९५० : ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ’ सुरू झाली. ‘नवशक्ती’ व ‘फ्री प्रेस जर्नल’व्यतिरिक्त अन्यत्र ‘मावळा’ या नावाने व्यंगचित्राद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सामर्थ्य देण्याचे काम केले. १३ ऑगस्ट १९६० : मराठीतील पहिले ‘व्यंगचित्र’ साप्ताहिक ‘मार्मिक’ची बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या समवेत सुरुवात. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन. ‘मार्मिक’ टिप्पणी करत साकारलेल्या व्यंगचित्रांसोबत ‘वाचा आणि थंड बसा’ असा उपरोधिक मथळा देऊन मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले. १९ जून १९६६ : शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवाजी पार्क येथील छोट्याशा घरात करण्यात आली. मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या न्याय्य हक्काचा लढा सुरू झाला. ३० ऑक्टोबर १९६६ : शिवसेनेची पहिली जाहीर सभा शिवतीर्थावर संपन्न झाली. या वेळी व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक होते. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे धोरण शिवसेनेने अंगिकारले. १९६७ : शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक सामोरी आली ती ठाणे नगरपालिकेची. शिवसेनेचा प्रचंड विजय. ठाणे नगरपालिकेने शिवसेनेस पहिला ‘नगराध्यक्ष’ देण्याचा मान मिळविला. ९ ऑगस्ट १९६८ : कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘भारतीय कामगार सेने’ची स्थापना. १९६९ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी रणशिंग फुंकले. शिवसेनाप्रमुखांना अटक. मुंबई पेटली. १९६९ : शिवसेनाप्रमुखांना ३ महिने कारावास. आंदोलनात ६९ तरुणांनी बलिदान केले. ५ जून १९७० : ‘परळ विधानसभा’ पोटनिवडणुकीत १० पक्षांच्या आघाडीचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांचा विजय. महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून गेले. १९७१ : मुंबई महानगरपालिकेत डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर विराजमान झाले. १९७२ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रमोद नवलकर विजयी. १९७२ : सरकारी/निमसरकारी कार्यालये आणि खाजगी कंपन्यांच्या कार्यालयातील नोकरभरतीत मराठी माणसांना-भूमिपुत्रांना प्राधान्य मिळविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना. २० नोव्हेंबर १९७३ : प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन. १९७५ : आणीबाणीस पाठिंबा. १९ जून १९७७ : दादर येथे शिवसेना भवनाचे उद्घाटन. १९७८ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत. मुंबई महापालिकेतही पराभव. शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव राजीनामा मागे. १९८५ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय. छगन भुजबळ महापौर. १९८७ : हिंदुत्वाची भूमिका घेऊन ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिली. याच विचारावर विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक लढविली. मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू यांचा विजय. २३ जानेवारी १९८९ : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू. संपादक : बाळासाहेब ठाकरे. १९८९ : लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती झाली. शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाले. प्रथमच लोकसभेत प्रवेश. १९९० : शिवसेनाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या अमोघ वाणीने झंझावात निर्माण केला. शिवसेनेचे ५२ उमेदवार विजयी झाले. ६ डिसेंबर १९९२ : अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी याची जबाबदारी झटकली. अखेर हे काम शिवसैनिकांनी केल्याचे म्हटले गेले, त्यावर शिवसेनाप्रमुखांनी “हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो” असे धाडसी उद्गार काढले. १९९२-९३ : मुंबईत दंगल उसळली. अखेर शिवसेनेमुळे तमाम हिंदूंचे रक्षण झाले अशी भावना सर्वत्र झाली. १९९५ : शिवसेना-भाजपा युतीने महाराष्ट्र राज्याची सत्ता काबीज केली. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर झाला. १९९७ : मुंबई महानगरपालिकेवर विजय. १९९८ : लोकसभा निवडणुकीत एन.डी.ए.चा विजय. शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात आले. ११ डिसेंबर १९९९ ते १० डिसेंबर २००५ : हिंदुत्वाच्या प्रचाराच्या मुद्यावरून ६ वर्षे शिवसेनाप्रमुखांवर मतदान करण्यास बंदी घातली गेली. २० एप्रिल १९९६ : ज्येष्ठ सुपुत्र बिंदुमाधव यांचे अपघाती निधन. ६ सप्टेंबर १९९६ : धर्मपत्नी माँसाहेब – मीनाताई ठाकरे यांचे निधन. २००३ : महाबळेश्वर येथील शिबिरात उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. २००७ : शिवसेनेचा मुंबई आणि ठाणे महापालिकेवर पुनश्च विजय. २०१० : युवा सेनेची स्थापना. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा नेतृत्वाची धुरा. १७ नोव्हेंबर २०१२ : मुंबई येथे ‘मातोश्री’ मुक्कामी परलोकी प्रयाण.

हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Wednesday, 21 January 2015

खुशखबर! व्हॉट्सअॅपची मजा आता डेस्कटॉपवरही


मुंबई : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. स्मार्टफोनवर वापर केल्या जाणाऱ्या या अॅप्लिकेशनची मजा आता डेस्कटॉपवरही मिळणार आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप जगभरात प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या 50 कोटींच्या पार पोहोचली आहे, यावरुनच त्या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. व्हॉट्सअॅप युझर्स बऱ्याच काळापासून ही सेवा डेस्कटॉपवर करण्याची मागणी करत होते. आता व्हॉट्सअॅपने युझर्सना ही भेटही दिली आहे. व्हॉट्सअॅपने नवी सेवा 'व्हॉट्सअॅप वेब' लॉन्च केली आहे. व्हॉट्सअॅपचे संस्थापक जैन कॉम यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे ही, "आजपासून पहिल्यांदाच लाखो युझर्स आता हे अॅप वेब ब्राऊजरवर वापरु शकतात. व्हॉट्सअॅप वेब फोनअॅपचंच ही अपडेट आहे. व्हॉट्सअॅप वेबवरही युझर्स फोनमधील मेसेज वाचू शकतात. याचा अर्थ असा की, युझर्सचे मेसेज ब्राऊजरसह फोनवरही उपलब्ध असतील." कसं वापराल 'व्हॉट्सअॅप वेब'? डेस्कटॉप व्हॉट्सअॅप सुरु करण्यासाठी युझर्सना गूगल क्रोम ब्राऊजरमध्ये https://web.whatsapp.com ही लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर एक QR कोड स्कॅन युझरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर दिसेल, ज्याद्वारे युझर मोबाईल व्हॉट्सअॅप स्कॅन करु शकतात. यासाठी युझरकडे व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये जाऊन 'व्हॉट्सअॅप वेब' ऑप्शनमध्ये गेल्यावर युझर हा कोड स्कॅन करुन सहजरित्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतील. कोणाला वापरता येणार 'व्हॉट्सअॅप वेब'? सध्या अँड्रॉईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन यूजर्झच व्हॉट्सअॅप वेबचा आनंद घेऊ शकतात. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी युझरचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणंही गरजेचं आहे. अॅपल आयफोन युझर डेस्कटॉपवर गूगल क्रोमशिवाय दुसरं ब्राऊजर वापरत नसतील तर त्यांना व्हॉट्सअॅप वेब वापरता येणार नाही.

Friday, 10 October 2014

लोककल्याणकारी राजा - छत्रपती शिवाजी महाराज

लोककल्याणकारी राजा - छत्रपती शिवाजी महाराज
रयतेच्या कल्याणाची काळजी घेणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा नाही. स्वराज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्या हिताची त्यांना असलेली तळमळ त्यांच्या कारभारातून, पत्रांतून दिसून येते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या लोकोत्तर राजाच्या जयंतीनिमित्त. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे समतेचे, रयतेचे राज्य होते. त्यांची लढाई मुघल- आदिलशहाविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती, धार्मिक नव्हती. त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिमही होते. त्यांच्या राज्यात भेदाभेद नव्हता. त्यामुळेच महात्मा जोतिराव फुले शिवरायांना "कुळवाडीभूषण' म्हणतात. शिवरायांनी शत्रूंच्याही स्त्रियांचा आदर केला. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचा महाराजांनी सन्मान केला होता. महाराजांना शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम होते, हे त्यांनी चिपळूण येथील जुमलेदार आणि हवालदार यांना 19 मे 1673 रोजी पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. ते म्हणतात, ""....रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही....'' रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हात लावू नका, अशा कडक सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. याच पत्रात महाराज पुढे सांगतात, "पावसाळा जवळ आलेला आहे. चारा, धान्य काटकसरीने वापरा. चारा आता संपवलात, तर पावसाळ्यात घोड्यांना चारा मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली, असे होईल. धान्य संपले, तर शेतकऱ्यांकडील दाणे, भाकरी, गवत, जळण, भाजीपाला आणाल. तेव्हा रयत म्हणेल, की मुघलापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. उन्हाळा असल्यामुळे आगट्या, चुली, रंधनाळा प्रसंगी आग भडकेल आणि खणाला (लाकडाला) लागेल. त्यामुळे लाकूड मिळणार नाही. रात्रीस दिवा घरात असेल, उंदीर दिव्याची वात नेईल. आग भडकेल, ते गोष्टी न हो, या करणे हमेशा फिरत जाऊन काळजी घेणे. सर्वांनी हुशार राहणे. जनावरांची आणि शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, अन्यथा मराठियांची इज्जत वाचणार नाही.'' शिवरायांनी मावळ्यांना काटकसर करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास सांगितले. घोडी मरू नयेत, आग लागू नये, याबाबत घ्यावयाची काळजी म्हणजे शिवरायांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मावळ्यांना दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. शिवरायांचे आपत्ती व्यवस्थापन आदर्शवत आहे. आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी नव्हे, तर आगच लागू नये यासाठी करावयाचे नियोजन, असे त्यांचे आपत्ती व्यवस्थापन होते. आग लागून लाकूड आणि चारा जळाला, तर मराठ्यांची इज्जत राहणार नाही, असे महाराज म्हणतात. प्रजेचे, जनावरांचे, पर्यावरणाचे रक्षण हीच मराठ्यांची इज्जत, अशी त्यांची भूमिका होती. प्रांताधिकाऱ्यांची वागणूक रयतेबाबत कशी असावी, याबाबतचे पत्र शिवरायांनी 5 सप्टेंबर 1676 रोजी लिहिलेले आहे. त्यात महाराज म्हणतात, ""...इमाने इतबारे साहेबकाम करावे येसी तू क्रियाच केलीच आहेस. तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन दाखविता रास व दुरुस वर्तणे... रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत येसे बरे समजणे... कष्ट करून गावचा गाव फिरावे..ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेत ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबल आसेली, त्या माफीक त्या पासी बैलदाणे संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, त्या वीण तो आडोन निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खडि दोन खडि (खंडी) दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल, तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी (व्याज- चक्रवाढ व्याज) न करिता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफीक घेतघेत उसूल घ्यावा...'' म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा गय केली जाणार नाही. कष्ट करून म्हणजे कंटाळा न करता गावोगावी जाऊन रयतेच्या समस्या पाहा. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी, धान्य नाही, त्याला बैलजोडी घेण्यास पैसे द्या. खंडी- दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी दोन लाख लारी खर्च झाला तरी चालेल; पण शेतकऱ्यांकडून बिनव्याजी मुद्दलच, तेही तो ऐपतवान झाल्यावर वसूल टप्प्याटप्प्याने करावे, अशा सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. शिवरायांचे स्वराज्य भ्रष्टाचारविरहित, श्रमकऱ्यांचे हित जोपासणारे होते. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले; पण कर्जाचा व्याजदर शून्य टक्के होता, हे वरील पत्रावरून सिद्ध होते. त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला नाही. शेतकऱ्यांना बैलबारदाना तर दिलाच, पण त्याच्या पोटासाठी खंडी- दोन खंडी धान्यही दिले. शेतीसाठी अनुदान देऊन उत्पादनात आणि शेती व्यवसायात प्रगती साधण्याचा शिवरायांचा प्रयोग अनुकरणीय आहे. सध्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या शेतकऱ्याची स्पर्धा विकसित देशांतील शेतकऱ्यांशी सुरू आहे. आजही शेतकऱ्याला स्वतःची गुंतवणूक करूनच शेती करावी लागते; पण साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा मोफत पुरवठा केला. त्यांना बैलजोडी घेऊन दिली. शेतकऱ्यांच्या पोटाला अन्न दिले. बिनव्याजी कर्ज दिले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. त्यासाठी तिजोरीवर बोजा पडला, तरी पर्वा केली नाही. आज महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळाने होरपळत आहे. अशा काळात शिवरायांचे कृषिधोरण शासन- प्रशासनाला मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, विनामोबदला काही घेऊ नका, असे सांगताना यातून शिवरायांची रयतेप्रती असणारी कनवाळू भूमिका प्रकर्षाने जाणवते. शिवरायांनी जमीन महसूल व्यवस्थेत आमूलाग्र क्रांती केली. जमिनीची पाहणी करून मोजणी केली, प्रतवारी ठरवली. आग्र्यावरून परतल्यानंतर शिवरायांनी सुमारे तीन वर्षे कृषी व्यवस्थेच्या सुधारणेसाठी खर्च केली. शिवकालीन पाणी साठवण योजना ही आजही त्यांच्या जल व्यवस्थापनाची साक्ष देत आहे. शिवरायांचा इतिहास केवळ ढाल- तलवारींचा आणि लढा यापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी सर्वोत्कृष्ट कृषिधोरणाचा पाया घातला. रचनात्मक प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यामुळेच साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याचे महत्त्व कायम आहे. राजे एका आज्ञापत्रात सांगतात, ""लाकूडफाटा तोडू नका. सागाची आणि आंब्याची झाडे अत्यंत उपयुक्त, ती एका सालात पैदा होत नाहीत. त्यांची जोपासना करावी. गडावरील पालापाचोळा खाली लोटू नका. तो एकत्र करून जाळावा व त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करावी.'' औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंह, सिद्दी जोहर यांच्याशी संघर्ष करतानाच्या काळातही आपल्या प्रजेची हेळसांड होणार नाही, याची दक्षता शिवरायांनी घेतली. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; पण ते हतबल, निराश, नाउमेद झाले नाहीत. शौर्य, धैर्य, औदार्य या गुणांच्या बळावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे वा भाषेचे नव्हते तर ते रयतेचे, लोककल्याणकारी राज्य होते. त्यामुळेच शिवरायांच्या राजमुद्रेत म्हटले आहे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। अर्थ - प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची ही विश्‍वाला वंदनीय अशी मुद्रा लोककल्याणार्थ शोभत आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक
हार्दिक शुभेच्छा !!